संवाद ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे. Email:drsklawate@gmail.com Call 9881250093

Monday, August 7, 2017







लीन संप्रदाय

मी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत, शिकत, स्वावलंबी झालो. या प्रवासात अनेकांचे सहाय्य झाले. त्यांच्याबद्दल माझ्या मनात निरंतर कृतज्ञतेचा भाव होता नि आहे. पण मी असे अनुभवले आहे की, प्रतिकूल परिस्थितीत सहाय्य करणारी माणसं ते निरपेक्षपणे करत नाहीत. आपण सतत त्यांच्या ताटाखालचं मांजर राहावं, अशी त्यांची धारणा असते. आजन्म लीन राहिलो की, अशी माणसं खूश असतात.
अलीकडे व्याख्यान, कार्यक्रम, शिबिरांच्या अनुषंगाने सर्वत्र फिरत असतो. मी काय पाहतो, तर नोकरदार दिवसेंदिवस दीन होताहेत. कारखाने, बँका, उद्योग, व्यापारात हे मी समजू शकतो; पण त्याहीपेक्षा गैर मला सार्वजनिक पैसा, साधनसंपत्तीच्या जोरावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासण्याचा उद्योग अत्यंत अस्वस्थ करतो. शिक्षकदिनी संस्थेतर्फे शिपायापासून प्राचार्यांपर्यंत त्यांच्याप्रती आदर म्हणून आम्ही सर्वांचा सत्कार करतो,’ असे सांगून शिक्षकदिनी एका संस्थेने मला व्याख्यानाला आमंत्रित केले; पण मी तेथे काय पाहिले तर एक छापील प्रमाणपत्र व फूल अध्यक्षांच्या हस्ते सर्वांना दिले. संस्थेचे अध्यक्ष असल्याने प्राचार्यांपासून शिपायापर्यंत सर्वजण अध्यक्षांच्या नतमस्तक झाले. मूळ कार्यक्रमच मुळी सर्वांना वार्षिक दीन करण्याचा होता.

समाजव्यवस्थाच अशी बनून गेली आहे की, नोकरदारांना खिंडीत गाठून लीन, दीन, मलीन, अधीन करत ठेवायचे. सहकारी साखर कारखाने, डेअरी, बँका, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे सर्वत्र हा सार्व‌जनिक सोपस्कर बनत त्याचं रूपांतर पाठीचा कणा नसलेला संप्रदाय आकाराला येऊ लागला आहे. त्यांना मन, मत, मनगट असून नसल्यासारखे आहे. खाल मान्या, हो नाम्याअसं जीणं त्यांनी आयुष्यभर जगायचं. काही कर्तृत्व नसताना तिकडे संस्थापकांचा, अध्यक्षांचा मुलगा, नातू, सून, मुलगी अध्यक्ष बनत राहतात, तर दुसरीकडे सामान्य‌शिपाई, लिपिक, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य रोज कणाकणाने एक दर्जे का नीचे का इन्सानबनत अस्तित्वशून्य होताहेत.

विशेषत: समाज घडविणारे घटक अस्तित्वशून्य होणं या समाजाला जागतिकीकरणाने दिलेला अभिशाप आहे. माध्यमातील नोकरदारही याला अपवाद राहिलेले नाहीत. समाजाचा बुद्धीजीवी वर्ग मतिमंद व मतिहीन करणे, त्यांना मतहीन बनवणे यासारखे सामाजिक अध:पतन दुसरे कोणते असू शकते? सध्या सर्वत्र लीन संप्रदाय वाढतो आहे. तो सामाजिक, सार्वत्रिक, सांसर्गिक प्रादुर्भाव वाटावा इतका त्याचा झपाट्याने प्रसार होतो आहे. त्यातही खेदाची व चिंतेची बाब म्हणजे, हा सारा खटाटोप सार्वजनिक साधनसंपत्तीच्या बळावर व्यक्तिप्रतिष्ठा जोपासण्याकामी खर्च पडतोय.

यासाठी जनजागृती, जनसंघठन, जनमतसंग्रह, आदी उपयांची चर्चा कालौघात होईलच; पण याला हस्तक्षेप म्हणून त्वरित व्यवस्था बदलाच्यादृष्टीने समाजमनाने अंतर्मुख होऊन सक्रिय व्हायला हवे. समाजजीवनात विश्वस्तवृत्तीचा विकास होणे हा त्यावरचा खरा उपाय आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृ‌तिक, आर्थिक, धार्मिक सर्वच क्षेत्रांत सर्वोच्चपदी जाणारी व्यक्ती इदं न ममम्हणणारी असेल तर मी तो भारवाही हमालअशी निरीच्छता त्याच्या ठायी येणार; पण त्यासाठी मोठ्या मूल्यसंस्कार व नैतिक पाठराखणीची गरज असते. मार्क्सवाद काय नि गांधीवाद काय, विचार म्हणून सर्वच वाद आदर्श असतात; पण वादाची सत्ता आली की, वादी विश्वस्त न राहता सत्ताधारी बनतात. यासाठी माणसाची जडणघडण महत्त्वाची. बुद्धीप्रामाण्य नागरिकांची निर्मिती शिक्षण व संस्कारातून होते. त्यासाठी घर, समाज, गाव, राज्य, राष्ट्र अशा सर्वच स्तरांवर त्याविषयीची भावसाक्षरता आणि संवेदनासूचकांक जपणे हे खरे लोकशिक्षण होय. त्यासाठी स्वतंत्र माणसाची घडण हे आपले उद्दिष्ट बनायला हवे. पेड-पौधे है बहुत बौने (बुटके) तुम्हारे, रास्तों मे एक भी बरगद (वड) नहीं है।कवी दुष्यंत कुमारांच्या या ओळी उगीचंच आठवत राहतात नि अस्वस्थता वाढत राहते.

 






संस्कृती आणि सभ्यता हे शब्द मानवी समाजात खरेतर एक दुसऱ्याचे पर्यायवाची होते; पण आज ते विरुद्धार्थी म्हणून वापरले जात आहेत. संस्कृती म्हणजे मानवी समाजाची जीवनपद्धती होय. संस्कृतीत शिष्टाचार, पोशाख, खानपान, भाषा, साहित्य, विचार, धर्म, तत्त्वज्ञान, कर्मकांड, कायदे, कला यांचा संगम असतो. या सर्व गोष्टी ज्या काळात संस्कृतीत आदर्शवत असतात, तेव्हा सभ्यता अस्तित्वात असते. कालपरत्वे संस्कृतीत बदल होतात. ‘जुनं ते सोनं’ हे तत्त्व सर्व बाबतीत लागू नसतं. माणूस समज नि अनुभवाने समृद्ध होतो तसतसा तो सुधारतो, आधुनिक होतो.

सिंधू, हडप्पापासून ते आजच्या जागतिकीकरणापर्यंतच्या संस्कृतीचा प्रवास पाहता काय दिसते? पूर्वी संस्कृती एका छोट्या प्रदेशावर साम्राज्य करायची. आज ती जगावर राज्य करायला निघाली आहे. पूर्वी राष्ट्रा-राष्ट्रांच्या संस्कृती भिन्न असत. आज संपर्कसाधने, तंत्रज्ञान, उद्योग-व्यापारांचे महत्त्वाकांक्षी वाढते साम्राज्य यामुळे पूर्वीच्या व्यापक संस्कृती लयाला जाऊन छोट्या-छोट्या संस्कृती उदयास आल्या. त्या स्वार्थ नि अर्थ या दोन खांबांवर उभ्या आहेत. आदिवासी संस्कृती आजही काही प्रदेशांत तग धरून आहे. जल, जमीन, जंगल हेच तिचे स्थावर-जंगम होते. मग भाषा नि साहित्याने तिच्यावर आक्रमण केले आणि लोकसंस्कृती निर्माण झाली. तिचे रूपांतर नागर संस्कृतीत झाले. त्यातून महानगरी संस्कृती उदयाला आली. ती जागतिकीकरणाचे अपत्य होय. या संस्कृतीने स्वत:ची शिष्टता, शिक्षण, तंत्र, रहिवास विकसित केला तो बुद्धीच्या आधारे, कमी श्रमात अधिक लाभ उकळायच्या शहाणपणाच्या जोरावर. ते शहाणपण बाह्य प्रभावी व आतून पोखरलेले असते, हे आता कालौघात लक्षात येऊ लागले आहे. ती अभिजात संस्कृती पूर्वीही नव्हती, आजही नाही. केवळ बहुजन नव्हे तर सर्वजन हितकारी संस्कृती खरी आदर्श संस्कृती.

कालपरत्वे सरंजामी, माध्यम, सिनेमा, दूरदर्शन, फॅशन, प्रादेशिक, आदी संस्कृती उदयास आल्या. या संस्कृतींचा एककलमी कार्यक्रम आहे, ‘सब घोडे बारा टक्के’ करायचे. म्हणजे काय तर आपल्याला हवी तशी माणसे घडवायची. पूर्वी माणूस विचार करायचा म्हणे! का तर तो वाचायचा. नव्या संस्कृतींनी माणसाचं वाचन तोडलं ते त्याने विचार करू नये म्हणून. आपली पुढची किंवा त्याही पुढची पिढी पाहा. ती सक्तीच्या क्रमिक पुस्तकांशिवाय काही वाचत नाहीत. तिला नुसतं नव्या संस्कृतींनी ‘सुशेगात’ केले आहे. खाओ, पिओ और मजा करो!’ त्यांना पत्र लिहिता येत नाही, आपुलकीनं बोलता येत नाही. कुणाच्या घरी जायचं म्हणजे अंगावर काटा. नातेवाईक एकतर बारशाला येतात, नाही तर बाराव्याला. तेही हाताची घडी नि तोंडावर बोट. तेरी भी चूप और मेरी भी! झाकली मूठ सव्वा लाखाची, उघडली तर फुकाची.

No comments:

Post a Comment