संवाद ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे. Email:drsklawate@gmail.com Call 9881250093

संवाद

संवाद
स्वर्ग अवतरायचा तर...

माझ्या निरीक्षणातील भारतीय मी नोंदवत आहे. हे सर्वसाधारण भारतीय होत. यातील प्रत्येक प्रकारात सन्माननीय अपवाद आहेत, याची मला पूर्ण कल्पना आहे. आपणास रस्त्यात पडलेला रुपया ओलांडून जाता येत नाही. आपण तो बिनदिक्कतपणे इकडे तिकडे न पाहता उचलतो. आपणास सार्वजनिक जीवनात शिस्त पाळणे जीवावर येते. ट्राफिक सिग्नल असलेल्या चौकात आपण किती उतावीळ असतो! समोरचा नियम पाळणारा असेल तर चक्क हॉर्न वाजवून त्यालाही नियम मोडायला भाग पाडतो. ओळ पाळणे आपणास कमीपणाचे वाटते. म्हणून जिथे ओळ असते, तिथे घुसखोरी अगदी होतेच होते. शिक्षणाचा व आपल्या जगण्याचा संबंध कमी. शिक्षण आपल्या लेखी मिळकतीचे साधन व माध्यम! घरी पुस्तके अपवादानेच. घर म्हणजे भौतिक संपन्न वस्तू व साधनांचे संग्रहालय. वेळेचा अपव्यव करावा तर तो आपणच. तासन्‍तास गप्पा, टीव्ही पाहणे, भटकणे, चैन करणे यात आपणास काही गैर वाटत नाही.

पैसे घेऊन मतदान करणे तर अनेकांची वृत्तीच होऊन गेली आहे. कार्यालयातले कोणतेही काम पैसे दिल्याशिवाय होणार नाही, याची आपणास खात्री असल्याने लाच देणे, घेणे हा गुन्हा न वाटता तो आपल्याला शिष्टाचार वाटतो. पेट्रोल पंपावर आपण जितके पैसे मोजतो, तितके पेट्रोल आपल्याला बहुतेकदा मिळतच नाही आणि आपण तसा आग्रहसुद्धा धरत नाही.

बऱ्याचदा रिक्षावाले मीटरपेक्षा अधिक पैसे मागतात नि आपण देतो. अडला नारायणम्हणून आपला व्यवहार पदोपदी. परस्त्री मातेसमानहा आपला आदर्श दुसऱ्याकडून पाळला जावा, अशी आपली अपेक्षा असते. आपण स्वत: कोरडा पाषाण. आपल्यासारखे स्थितीस्थापक आपणच. सिंगापूरला गेलो की शिस्तबद्ध, मुंबईत पाऊल ठेवताच मूळ भारतीय. स्वच्छता दुसऱ्याने पाळावी. आपण सालं, कपटे, कचरा, बडके गुपचूप टाकतो ते चलता हैम्हणून. कर भरणे हा आपणास तोटा वाटतो. चुकवणे म्हणजे मिळवणे हे आपले जीवन तत्त्वज्ञान व ध्येयही!

कामात कुचराई आपल्या दृष्टीने क्षम्य; पण दुसऱ्याने केली की, आपण तडक फाशीची भाषा वापरतो. स्वजातीचा वृथा अभिमान व परजातीची असूया आपल्यात मुरलेलीच म्हणायची. तीच गोष्ट धर्माची. दया, क्षमा, शांती म्हणजे बुळेपणा आणि अरेरावी, दांडगाई म्हणजे पुरुषार्थ, असे आपण मानतो. मी म्हणजे कोण, दुसरा किस झाड की पत्ती!वाचाळता आपला स्थायीभाव. कृतिशीलता अपवादाने! आपण दाखवतो तसे नसतो. जे असतो ते जगास दिसत नाही म्हणून बरे! एकमेकां साह्य करूंआपणास तोंडपाठ असते. पण अपघात दिसताच आपण पळ काढतो. खरे संवेदनशीलच मदतशील असतात. जिवाभावाचे नाते, जगणे, ते अल्पशिक्षित अधिक जगतात. शिक्षित आत्मकेंद्री, स्वार्थी अधिक.


आता पुरुषाने बाळाला जन्म दिला म्हणजे निसर्गचक्र बदलले हे नक्की झालं. निसर्ग हरला, माणूस जिंकला! आता कोणताही शोध लागणे सहज शक्य. म्हणजे असे की, आपल्या मनात काय आहे ते पडद्यावर दिसू शकेल. मनात आणायचा अवकाश! पण काही गोष्टी अशक्य नसल्या तरी अवघड होत जातील. म्हणजे माणूस सत्शील राहणे, सदाचारी होणे, बुद्धिप्रमाण वागणे, दैववादी न होणे, वि‌वेक व विज्ञानाच्या कसोटीवर जगणे, आदी. त्या सर्व गोष्टी सोप्या नि सहज करायचा एकच उपाय आहे. जे विधायक, हितकारी, वैध आहे असे आपण शिकतो, जाणतो ते आचरणात आणू. दुसरा काय करतो, याचा विचार न करता आपले आचरण दुसऱ्यास अनुकरणीय वाटावे, असे वागू. आपल्या नैतिक कसोटीवर दृढ राहू. पहा, एक दिवस असा येईल, लोक म्हणतील अरे सत्ययुग आले तर. आपली जन्मभूमी स्वर्ग झाल्याचा आनंद मिळवायचा असेल तर स्वत:च सत्यवान झाले पाहिजे नि सावित्रीपण!

डॉ. सुनीलकुमार लवटे

No comments:

Post a Comment